बुधवार, 15 दिसंबर 2010

संजय टिकरिया सिंगापोर अभ्यास सहल

सिंगापोर येथील शालेय विद्यार्थ्याना प्रयोग साहित्य दाखवताना संजय; टिकरिया
आगरकर सर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्रीयन शिक्षकांचा सिंगापूर दौरा Bookmark and Share Print E-mail


एशियन ब्रँच ऑफ कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ सायन्स, टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स एज्युकेटर्स यांच्या माध्यमाने भारतीय शिक्षकांनी डॉ. सुधाकर आगरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरचा दौरा केला. हा प्रवास तेथील शैक्षणिक स्थितीबाबत बरेच काही शिकवून गेला. विचार करण्यास, चिंतन करण्यास प्रवृत्त करणारा, मजबूर करणारा हा दौरा ठरला. याविषयी..
महाराष्ट्रातील १६ आणि आंध्र प्रदेशातील १ अशा शिक्षकांचा दौरा सिंगापूरमधील शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहून मन दिपवून टाकणारा ठरला. दक्षिणपूर्व आशियाच्या मलेशिया व इंडोनेशिया या देशांदरम्यान असलेले हे बेट. लोकसंख्या ४७ लाखांची. जगातील सर्वाधिक घन लोकसंख्या असणारा दुसरा देश. जन्मदर ८.६५ तर मृत्यूदर ४.८ असा आहे. फक्त शहरी वस्ती असणारा हा देश ९४ टक्के साक्षर आहे. जून ते सप्टेंबपर्यंत दक्षिण मान्सून तर डिसेंबर ते मार्च उत्तर मान्सूनच्या पावसाचा मारा या बेटावर होतो. गरम, आद्र्र व पावसाळी वातावरण असलेल्या या छोटा प्रदेशाचे मासे, खोल पाणी लाभलेले बंदर, समुद्रातील तेल हे नैसर्गिक स्त्रोत होत.
१८१९ च्या २९ जानेवारीला ‘थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स’ या इंग्रजाने दक्षिण-पूर्व आशियाच्या बेटावर पाऊल ठेवले. येथील एकूणच भौगोलिक स्थिती पाहून व्यापार-उदीम व दळणवळणाचे सागरी मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्याचे महत्व जाणत मलायाच्या सुलतान हुसेन शहा बरोबर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या वतीने करार केला. येथे ब्रिटीशांनी अधिकृत वस्ती केली. तद्नंतर १८२४ मध्ये पूर्ण सिंगापूर ही ब्रिटीशांची वसाहत म्हणून मलायच्या सुलतानाशी करार केला व येथे ब्रिटीश अंमल सुरू झाला. १८२६ पर्यंत येथे एक लाख लोकवस्ती असल्याचा उल्लेख आहे.
९ ऑगस्ट १९६५ रोजी सिंगापूर हे ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झाले, आणि ‘रिपब्लिकन सिंगापूर’ म्हणून या देशाचा जन्म झाला. या स्वतंत्र देशातील न्यायव्यवस्था ब्रिटीश कायद्याप्रमाणे सुरू आहे. दर सहा वर्षांनी देशाचा अध्यक्ष निवडणुकीद्वारा निवडला जातो. सदस्यांच्या निवडीनंतर बहुमतावर देशाच्या पंतप्रधानांची निवड होते. मुक्त अर्थव्यवस्था व भ्रष्टाचारमुक्त वातावरण हा येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, आयटीच्या उत्पादीत वस्तू, औषधी, रबर प्रॉडक्टस् व पेट्रोलियम प्रॉडक्टसच्या निर्यातीवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
‘सिंगापूर’ हे देशाचे इंग्रजी नाव मलाया भाषेतील ‘सिंगापुरा’ या नावाचा अपभ्रंश आहे. हे नाव संग निला उत्मा यांनी ठेवले असून संस्कृतमध्ये सिंध (सिंह), पुरे (पूरम) नगर (सिंहाचे नगर) असा अर्थ आहे.
शिक्षण
सिंगापूर देश आकाराने लहान असला तरी शिक्षण क्षेत्रातील त्यांची भरारी जगाने दखल घेण्याइतपत आहे. देशाच्या एकूण अर्थसंकल्पाच्या २० टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. यावरून तेथील राजकारण्यांची शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याची इच्छाशक्ती लक्षात येते. सिंगापूरचे शिक्षण मंत्रालय हे शिक्षणाचा विकास, नियंत्रण, निर्देशन, मार्गदर्शन व आर्थिक तरतुदी करण्याचे काम करते. २००० मध्ये सिंगापूर सरकारने सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाचे वय, विद्यार्थ्यांचे नाव दाखल करण्यात केलेली कसूर, विद्यार्थ्यांच्या हजेरीकडे पालकांनी केलेले दुर्लक्ष या बाबींचा फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात समावेश केलेला आहे. यासाठी धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना वगळले आहे. अर्थात यासाठी शिक्षण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक ठरवले आहे. अपंगांच्या शिक्षणाचीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष शिक्षणव्यवस्था असून यासाठीच्या व्यवस्था स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येतात. अशा संस्थांना सरकार भरघोस मदत करते. सिंगापूरमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. इंग्रजी भाषेबरोबर एक मातृभाषा शिक्षणे आवश्यक असते. (चिनी, मलाया किंवा तामिलीपैंकी एक)
३ ते ६ वर्ष वयोगटासाठी ‘पूर्व प्राथमिक शाळा’ आहे. सिंगापुरात यांना किंडरगार्टन्स् (चित्रे वगैरेच्या सहाय्याने लहान मुलांना शिकविणारी शाळा) म्हणतात. यात प्रामुख्याने मुलांनी एकमेकांशी कसे वागावे, एकत्र खेळावे आदिंसह प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीचे शिक्षण देण्यात येते. अशा प्रकारे तीन वर्षांत हे पूर्ण करतात. भाषाज्ञान, अंकज्ञान, खेळ, गाणे इ. चा यात समावेश आहे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून प्राथमिक शिक्षणाची सुरवात होते. पहिल्या चार वर्षांत इंग्रजी, एक मातृभाषा व गणित शिकवले जाते. नागरिशास्त्र व नैतिकतेचे धडे दिले जातात. चित्रकला, संगीत, आरोग्य व सामान्य विज्ञान हे विषय प्रायमरी पहिली ते सहावीपर्यंत शिकविले जातात. प्रायमरी तिसरी पासून सामान्य विज्ञानाची सुरूवात होते. साधारणत: प्रत्येक विद्यार्थी सात विषयांपेक्षा अधिक विषय शिकतो. सिंगापूर मध्ये शासकीय १३३ व अनुदानीत ४१ प्राथमिक शाळा आहेत.
विद्यार्थ्यांचे सहा वर्षांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचा माध्यमिक शाळेतील प्रवेश ठरतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशावर निर्धारित ही प्रवेश प्रक्रिया आहे. काही विद्यार्थी माध्यमिक शाळांऐवजी व्यावसायिक शिक्षणाकडे प्रवेश घेतात व पुढे त्यात ते पदवी घेतात. माध्यमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरत असते. सर्वसाधारणपणे चार वर्षांच्या कालावधीत त्यांची विभागणी होते.
काही विद्यार्थी माध्यमिक शाळांऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन त्यातच पुढे पदवी घेतात. परीक्षा पास केल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. सिंगापूरमध्ये माध्यमिक शाळांची संख्या शासकीय १२०, अनुदानीत २८, स्वतंत्र ५ व विशेष १ अशी आहे. याशिवाय सिंगापूरमध्ये पाच पॉलिटेक्निक्स् कॉलेजही आहेत. त्यात तीन वर्षांचे विविध कोर्सेस आहेत. याशिवाय सिंगापुरात नॅशनल युनिव्हर्सिर्टी ऑफ सिंगापूर, नयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड डिझाईन व सिंगापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अशी पाच विद्यापीठे आहेत. या विद्यापीठात पदवी व पदवीतर शिक्षण दिले जाते. या सर्व शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. (क्रमश:)
सिंगापोर शैक्षणिक सहली मधे सहभागी शिक्षक

सिंगापूरमधील शैक्षणिक संस्था Bookmark and Share Print E-mail

एशियन ब्रँच ऑफ कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ सायन्स, टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स एज्युकेटर्स यांच्या माध्यमाने भारतीय शिक्षकांनी डॉ. सुधाकर आगरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरचा दौरा केला. हा प्रवास तेथील शैक्षणिक स्थितीबाबत बरेच काही शिकवून गेला. विचार करण्यास, चिंतन करण्यास प्रवृत्त करणारा, मजबूर करणारा हा दौरा ठरला. याविषयी..
महाराष्ट्राच्या शिक्षकांनी भेट दिलेल्या शैक्षणिक संस्थांची स्थिती
१) डनमॅन हायस्कूल - सिंगापुरातील अतिशय यशस्वी, उच्च दर्जाचे शिक्षण देणारी ऑटोनामस् को-एज्युकेशन सेकंडरी स्कूल आहे. या शाळेचे प्रिंसिपॉल डॉ. फु सूवान फाँग आणि व्हाइस प्रिसिंपॉल फुन फुक वेंग. १ जानेवारीपर्यंत शाळांतील प्रवेश प्रक्रिया संपून प्रत्यक्ष शिकविण्यास सुरूवात होते. प्रारंभीचे १० आठवडे शाळा व नंतर एक आठवडय़ाची सुटी असते. पुन्हा आठ आठवडे शाळा व नंतर आठ आठवडे अवकाश असतो. परंतु परत १० आठवडे शिकवणे होऊन एक आठवल्याची सुटी असते. यानंतर आठ आठवडे शाळा असते नंतर परीक्षा व डिसेंबरअखेर निकाल.
शाळेतील पायाभूत सुविधा पाहाव्यात म्हणून शाळेतील फिजिक्स व गणित शिक्षिका लीम जेन सी यांनी आग्रह धरला. हे सर्व पाहता पाहता आमचे तीन तास कुठे निघून गेले ते कळलेच नाही. खऱ्या अर्थाने मॉडेल स्कूल कसे असावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शाळेचे २००० पर्यंत विद्यार्थी व २११ शिक्षक आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासाठीच्या भव्य प्रयोगशाळा पाहिल्या, मात्र त्यांच्या जोडीला नॅनोटेक्नॉलॉजी प्रयोगशाळाही होती. आपल्याकडील संकल्पनेत शिक्षकांनी बसण्यासाठी टाकलेल्या गाद्या व त्यांची वैयक्तिक कपाटे, पाणी पिण्याचा माठ किंवा नळ व असलाच तर अ‍ॅटॅच संडास-बाथरूम. अवाढव्य हम्ॉल, संपूर्ण वातानुकूलीत यंत्रणा, त्यात प्रत्येकाचे मोठे टेबल, टेबलावर लागणारे संदर्भ ग्रंथ आणि इतर साहित्य व सर्व सोयी. याशिवाय शाळेतील वाचनालयही अतिभव्य अशा तीन मजली इमारतीत. पहिला मजला शिक्षकांसाठी संदर्भ ग्रंथ असलेला व दुसरे दोन मजले विद्यार्थ्यांसाठीच. नियमित विद्यार्थ्यांना ११ व वसतीगृहात राहणाऱ्याला ५०० सिंगापूर डॉलर एवढी प्रतिमाह फी आकारली जाते. या शाळेत चिनी मातृभाषा शिकवली जाते. शाळेने गेल्या तीन वर्षांत मिळवलेल्या विविध बक्षिसांबद्दलही माहिती देण्यात आली.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने व इतरांना सुटय़ा असल्याने विद्यार्थ्यांशी वार्तालाप करणे जमले नाही याची खंत मात्र मनात आहे. इमारती पाहण्याचा कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकाला संस्थेने एक फॉर्म दिला. त्यावर संस्थेच्या कोणत्या गोष्टी आवडल्या, का आवडल्या, कोणत्या आवडल्या नाहीत व का आवडल्या नाहीत तसेच काही ‘सजेशन्स्’ असल्यास थोडक्यात लिहा, असा फॉर्म तातडीने भरून द्यायचा होता. झकास पाहुणचारानंतर आम्ही तेथून बाहेर पडलो.
२) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर
सिंगापूरमधील चार विद्यापीठांपैकी हे एक होय. याशिवाय अनेक विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपली क्षमता दाखविण्यास वाव मिळतो. जगातील १०० देशातील सुमारे ३० हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या विद्यापीठात १४ शाखामधून जवळपास १०० च्या वर कोर्सेस शिकवले जातात. येथे पदवीचे शिक्षण रिसर्च करताना किंवा नियमित कोर्सेसव्दारे करता येते. उदा. फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंगव्दारे १८ विविध नियमित कोर्सेस आहेत तर ७ कोर्सेस रिसर्चव्दारे पदवी प्राप्त करता येण्यासारखे आहेत. या विद्यापीठातील बायोइंजिनिअरींग विभागास आम्ही भेट दिली. प्रो. पॉल मास्तू डायरा या क्षेत्रातील वजनदार प्रस्थ. परंतु आम्हाला १० मिनीटे उशीर झाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही मुकलो. मात्र त्यांनी प्रो. व्हिक्टर होरो डिंको यांच्याकडे ही जबाबदारी दिली. या विभागातील अतिभव्य प्रयोगशाळा पाहिल्या. प्रश्नांची उत्तरे देत-देत, चर्चा करत-करत वेगवेगळ्या प्रयोगशाळा दाखविल्या. या सर्वाचा मानवी जीवनासाठी काय उपयोग आहे, यासाठी अधिकाधिक संशोधन करणे ही काळाची गरज आहे. प्रामुख्याने टॅनल इलेक्ट्रॉनिक्स मायक्रोस्कोप, स्कॅनींग इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, क्रायो इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप विथ् स्क्रीन अशी विविध सूक्ष्मदर्शी यंत्रणे दाखविली. या सूक्ष्मदर्शकांची मांडणी, भव्यता डोळे दिपवणारी होती. आमचे टिमचे प्रमुख डॉ. आगरकरांनी नंतर आम्हाला आपला (भारत) यापेक्षा पुढे आहे, हे सांगितल्याने मनाला समाधान झाले. प्रयोगशाळेत तपमान कसे नियंत्रित केले जाते, टिश्यु कल्चर कसा करतात, त्याचे उपयोग, इन्क्युबेटर, बायॉलॉजीकल स्कॅनींग, नॅनोमिटर आदि सर्व बाबी समजून घेतल्या.
३) सिंगापूर सायन्स सेंटर
प्रत्येकाने सिंगापूरला आल्यावर सिंगापूर सायन्स सेंटरला भेट द्यावी अशीच ही जागा आहे. सेंटरमध्ये साऊंड एक्झिबिशन, क्लायमेंट चेंजेस, स्पेस सायन्स, सौरऊर्जा असे वेगवेगळे विभाग आहेत. अनेक विभागातील बऱ्याच बाबी प्रत्येकाला स्वत:ला हाताळता येतात हे या सेंटरचे खास आकर्षण आहे. विज्ञान प्रदर्शनाची मांडणी कशी करावी याचेही प्रशिक्षण आम्हाला आपोआप मिळाले.
४) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन
ही संस्था म्हणजे चांगल्या शिक्षक निर्मितीचा कारखाना होय. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्था व व्यवस्थापन जागतिक स्तरावरचे असून त्याला तशी मान्यताही आहे. या संस्थेत एकूण ६७२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ७२ टक्के महिला आणि २८ टक्के पुरूष विद्यार्थी आहेत. सुरूवातीला सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेबद्दल, शैक्षणिक नितीबाबत, शिक्षण पद्धतीबाबत, अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्याशी तासभर चर्चा होऊन विचारांची देवाण-घेवाण झाली. वेगवेगळ्या विषयांच्या शिकविण्याच्या पद्धतीबाबतही उहापोह झाला. एका छोटेखानी कार्यक्रमात प्रो. ए सीन ली यांच्याहस्ते शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
थोडक्यात शिस्त, स्वच्छता, स्वत्व, स्वदेशाबद्दल स्वाभिमान, म्हणजेच सिंगापूर. डॉ. कांतीलाल टाटिया शहादा